Thursday, October 3, 2024

पुस्तक सारांश : ‘१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू’ या पुस्तकातील टॉप १३ कृती

 



Credit : Amazon


पुस्तकाचे नाव : १०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू

लेखकाचे नाव : निगेल कंबरलँड

अनुवादक : विनिता गनबोटे

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

 

यशस्वी व्यक्तिमत्वासाठी १०० लहानश्या कृती

 

१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू हे पुस्तक एक व्यक्तिमत्वविकासावर आधारित पुस्तक असुन या पुस्तकात अश्या १०० कृती दिलेल्या आहेत ज्याचा अवलंब करून आपण आपल्या आयुष्यात एक नवीन क्रांती घडउन आणु शकतो. या पुस्तकाचे लेखक निगेल कंबरलँड हे आहेत. आज आपण याच पुस्तकातील टॉप १३ कृती पाहाणार आहोत.

 

कोण आहेत हे निगेल कंबरलँड :

 

निगेल कंबरलँड हे एक ब्रिटिश लेखक असुन लीडरशिप कोच देखील आहेत. तसेच दि सिल्क रोड पार्टनरशिपचे संस्थापक ही आहेत. त्यांनी आठ पुस्तक लिहिली आहे, त्यातील बरीच पुस्तक जगभरातील विविध भाषांत अनुवादित झाली आहेत.

 

कुठल्या आहेत त्या टॉप १३ लहानश्या कृती :

 

१)     तुमच्या स्वप्नांचा मागोवा घ्या :

 

तुमची स्वप्ने तुमच्या यशाचे स्त्रोत असतात. स्वप्नांशिवाय जीवनातील यश अर्थपूर्ण होऊ शकत नाही. एखाद्या गाडीच्या इंजिनला इंधनाशिवाय गती मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे स्वप्नरहित जीवनाला गती न मिळण्याचा धोका संभवतो. प्रत्येक यशस्वी माणसामागे त्याचे परिपूर्ण होणारे स्वप्नच असते.

 

  स्वत:चे स्वप्न जाणून घ्या :

 

 तुमचे स्वप्न काय आहे? तुम्हाला जीवनात काय साध्य करायचे आहे? तुमच्या कोणत्या स्वप्नांचा       पाठपुरावा तुम्ही करणार आहात?

शब्द, रेखाटणे व चित्रे यांच्या एकत्रित सहाय्याने एक यादी तयार करा. याचा उपयोग तुमच्या कल्पनांचा परस्परसंबंध जुळून येण्यासाठी होईल, तसेच विस्मरणात गेलेली ध्येये व आकांक्षा यांचाही उलगडा होईल.

 

तुमच्या स्वप्नांवर सकारात्मकतेने विश्वास ठेवा :

 

तुमची स्वप्ने प्रत्यक्षात कशी उतरवता येतील, याचा विचार करा व त्या संदर्भात तुमच्या मनात येणा-या भयकारक वा नकारात्मक विचारांचा मागोवा घ्या. कदाचित, तुमचे मन म्हणेल, ‘हे करायला फार उशीर झाला आहे. माझे आता वय झाले आहे किंवा माझे पालक माझ्या इच्छेला पाठिंबा देणार नाहीत.तरी पण मनाचा दृढनिश्चय करुन कामाला सुरवात करा व पुढील वाटचाल करा.

 

तुमचे स्वप्न साकारण्यासाठी मार्ग शोधा :

 

आपले स्वप्न कसे पूर्ण करावे, यावर विचार करताना नकारात्मकता व नाउमेद होण्याची भीती तुम्हाला ग्रस्त करु शकते. तरी तुद्धा महत्वाचे हे की, तुम्ही आता कोठे आहात व कुठे पोहोचण्याची तुमची मनीषा आहे हे जाणून त्यातील अंतर कसे भरुन काढता येईल, याचा शोध घ्या.

 

२)    मदत मागा :

 

मला माहित नाही असे कबूल करायला हिंमत लागते ; पण ती व्यक्ती कमालीची सकारात्मक असून, स्वतःला जास्त गंभीरपणे घेत नसल्याचे ते चिन्ह आहे. स्वतःला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही हे जाणून ते प्रामाणिकपणे कबूल करणे, हे तुमच्यातील मोठे कौशल्य असते. जीवन खूपच अशाश्वत व गुढ असते. प्रत्येक वेळी तुमचे बरोबरच असेल असे नाही. कधी कधी परिस्थितीचे शांतपणे पुनर्निरीक्षण करुन एखाद्याची मदत स्वीकारणे उत्तम असते.

  

 स्वतःमधील कमतरता जाणून घ्या :

 

तुमचे मत चुकीचे असू शकते ही वास्तविकता डावलून, तुम्ही कधी स्वतःच्या मतांवर ठाम राहिले आहात

का?

स्वतःच्या स्वभावात बदल घडवायची इच्छा बाळगून अधिक मनमोकळे राहा. दिवसभराच्या   कामांसंदर्भात निर्णय घेताना, मत बनविताना किंवा तोडगा शोधताना, माझ्याकडून नजरचुकीने काही दुर्लक्षित तर झाले नाही ना?’ किंवा एखाद्या गोष्टीला मी पाहिले नाही’, अशी दुसरी बादू आहे का?’ असे प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय ठेवा.

  

 तुम्हाला हितचिंतकाची गरज आहे :

 

स्वतःमधील कमतरतांची जाणीव होणे थोडे कठीण असते. स्वतःतील दोष समजण्यासाठी तुमचे कुटुंबीय, मित्र व सहकारी यांची मदत घ्या. मध्यकालीन राजाच्या दरबारातील सल्लागाराप्रमाणे ते तुम्हाला तुम्ही अति जिद्दीपणाने वागाल तेव्हा, स्वतःचेच हसू करुन घ्याल तेव्हा व स्वतःलाच अतिगांभीर्याने घ्याल तेव्हा त्याची जाणीव करुन देतील.

 

स्वतःच स्वतःवरच हसणे शिका :

 

यशस्वी लोक नेहमी स्वतःच्या चुका व चुकीचे विचार यांपासून धडा घेऊन ते सुधारतात. चुकांचा स्वीकार विनम्रपणे करुन त्यावर हसायला शिका.

 

३)    स्वतःचे भविष्य स्वतःच घडवा :

 

यशस्वी लोक कधीही नशिबावर किंवा संधीवर अवलंबून राहात नाही. फक्त स्वप्न असणे व त्यासाठी आवश्यक त्या योजना आखणे पुरेसे नसते. आपल्या योजना अमलात आणताना नशीब व संधी यांवरच संपूर्णपणे अवलंवून न राहता स्वतःला घडविण्याची हिंमत दाखविणे गरजेचे असते. तुमच्या भवितव्यावर कधीही विसंबून राहू नका. आतापर्यंत यश मिळाले नाही म्हणून पुढेही ते मिळणारच नाही, असे मानणे फार सोपे असते ; पण उज्वल भवितव्य हवे असेल, तर अशा सर्व घातक विचारांवर मात करणे अत्यंत गरजेचे असते.

भविष्य घडविताना भूतकाळात जे घडून गेले त्याचा परिणाम न होउ देण्यासाठी प्रथम मानसिक तयारी लागते. तुमची विचारप्रणाली त्यात महत्त्वाचे काम करते. तुम्ही स्वतःचे भविष्य घडवायला समर्थ आहात, असे ठामपणे म्हणू शकता? William Ernest Henley यांच्या Invictus या कवितेत म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात.

 

इतरांना तुमचे खच्चीकरण करु देऊ नका :

 

तुमचे कुटुंबीय, मित्र व सहकारी यांच्यासमोर तुम्ही तुमची भविष्यातील स्वप्ने सांगण्यासाठी उत्सुक असाल ; पण तसे करताना काळजी घ्या. अनेक लोक जीवनाकडे पेला अर्धा रिकामा आहे अशा दृष्टिकोनातून बघतात. काही लोक अपेक्षा असणारे, मत्सरी वा नकारात्मकवृत्तीचे किंवा तिरसट असू शकतात.

तुमच्या योजनांची सखोलता इतरांना कळू शकणार नाही, तेव्हा त्यांना ती जाणायला थोडा अधिक वेळ द्या. तुमचे भविष्य घडविण्याच्या कामाला पोषक असे वातावरण निवडा. ज्यांना तुमच्या योजना मान्य नाहीत, अशा लोकांपासून कदाचित तुम्हाला दूर रहावे लागेल. स्वतःच्या योजनांबाबत सकारात्मक व विधायक विचार करा.

 

स्वतःची मनोवृत्ती बदला :

 

तुम्ही स्वतःचे भवितव्य स्वतःच घडवू शकता, या शक्यतेबद्दल तुम्हाला विश्वास बाळगणे कठीण वाटत आहे का? अशा विचारांवर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण आहे. अशा विचारांचा उगम कशातुन झाला आहे ते जाणून घ्या. असे सर्व नकारात्मक विचार आजच लिहून काढा.

स्वतःच्या योजनांना अडथळा ठरु शकणारे विचार कागदावर उतरवा आणि सर्व नकारात्मक परिस्थितीवर मात करु शकतील अशा सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तुमच्या भविष्यातील योजना व उद्दीष्टे यांचा मागोवा घेउन त्यांपैकी कशा संदर्भात तुम्हाला काळजी वाटते, हे स्वतःलाच विचारा.

 

४)    भावनिकरीत्या बुध्दिमान बना :

 

आपल्या भावनांना आवर घालता आला नाही, तर यशस्वी जीवन जगण्याच्या प्रयत्नात त्याचा अडसर ठरु शकतो. यश व अपयश यातील फरकाला ते कारणीभूत ठरु शकते.

यशस्वी व परिपूर्ण जीवनासाठी भावनिक बुद्ध्यांक चांगला असणे अत्यंत गरजेचे असते. यशस्वी जोडीदार, पालक किंवा सहकारी होण्यासाठी ही मूलभूत गरज असते. भावनिक उद्रेकामुळे अनेकांची यशस्वी कारकीर्द, लग्न, कुटुंबव्यवस्था व भागीदारीतील उद्योग मोडकळीस आले आहेत.

स्वतःला दुस-यांच्या ठीकाणी ठेवून किंवा जीवनाकडे दुस-या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघता येणे हे उच्च बुद्ध्यांकाचे लक्षण आहे.

 

   प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी क्षणभर थांबा :

 

विचार न करता प्रतिक्रिया दिल्यामुळे पश्चात्ताप वाटण्याची शक्यता असते, त्यामुळे असे करणे टाळा. यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहून त्या क्षणी आपल्याला राग येत आहे की हेवा वाटत आहे हा विचार करावा. अशा वेळी वाचीक किंवा कृतीतून प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी क्षणभर थांबा, थोडा वेळ काहीही बोलू नका. उभे असाल तर खाली बसा, बसल्यामुळे लोक तुलनेने अधिक शांत राहू शकतात. आपल्या सभोतालच्या लोकांना, तुम्ही बोलणे अपेक्षित असले, तरी मला विचार करायला थोडा वेळ द्या असे म्हणून थोडा वेळ निभावून न्या.

 

समजूतदारपणा बाळगा :

 

दुस-यांच्या भावना समजून घेणे, त्यांना नेमके काय सांगायचे आहे ते नीट जाणून घेणे, हे कौशल्य असणे खूप चांगले असते.

दुस-याला समजून घेण्यासाठी वाट पाहाणे यात खरा समजूतदारपणा नसून, तो समजूतदारपणा स्वतःच्या स्वभावात भिनण्यात आहे. दुस-याकडे लक्ष देऊन त्यांना पुरेसा वेळ देऊन, त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना काय वाटते ते प्रयत्नपूर्वक समजून घ्यावे लागते. आपल्या निकटवर्तीयांकडे दुर्लक्ष करु नये.

 

 

५)    नेमके उलट करा :

 

 बहुसंख्य लोक यशस्वी जीवन जगत आहेत, असा विचार तुम्ही करत नसाल तर हीच शक्यता असते की, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुमच्या सभोवतालच्या लोकांपेक्षा वेगळे तुम्हाला वागता आले पाहिजे.

सर्वसाधारणपणे इतरांपेक्षा वेगळा विचार करणे किंवा वेगळी कृती करणे हे केवळ वेगळेपणा दाखविण्यासाठी नसावे. अनेक वेळा बहुतांश लोकांनी अनुसरलेला मार्गच योग्य असतो.

कधी कधी असे वेगळे मार्ग स्वीकारणे गैरसोयीचे ठरु शकते, त्यामुळे तुम्हाला एकटे पडल्यासारखे वाटणे वा काळजी वाटणे स्वाभाविक आहे. वेगळा मार्ग पत्करताना तुमच्या कुटुंबीयांचे, मित्रांचे व सहका-यांचे सल्ले डावलून पुढे जाणे सोपे नाही ; पण तुम्ही तो निर्णय कसा व का घेतला आहे, हे त्यांना समजावून सांगण्याची मानसिक तयारी दाखविली, तर ते निश्चितपणे तुम्हाला साथ देतील.

 

   एकट्याची वाटचाल ठीक आहे :

 

गैरसोयीचे वाटणे किंवा सर्वांपेक्षा वेगळे असण्याची सवय करा. तुमचे निर्णय योग्य कसे आहेत ते पटवून

देण्याची गरज नाही. इतर लोक तुमचे तर्कशुध्द विचार व तुमच्या हुशारीविषयी शंका घेतील, तरी त्याकडे दुर्लक्ष करा.

 

जगावेगळे काम करण्याची सवय करा :

 

आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला कामाचे अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत किंवा उद्दिष्ट साध्य   होत नाही असे वाटते का ? एखादे काम परत परत करुनही तुम्हाला ते परिणाम मिळत नाहीत का ? तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी वेगळे काय करायला पाहिजे, याचा विचार करा.

 

६)    हसत – खेळत काम करा :

 

तुम्हाला तुमच्या कामात आनंद वाटतो का? सकाळी उठून का-यालयात जाण्यासाठी तुम्ही उत्साहाने तयार होता का? दोन्हींपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर असे वाटणारे तुम्ही एकटेच नाहीत. २०१४ मधील कॉन्फरन्सबोर्डच्या सर्वेक्षणानुसार ५०% अमेरिकन लोक कामाच्या बाबतीत नाखूश असल्याचे आढळून आले आहे. CIPD ने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार २३% ब्रिटिश लोक त्याच कारणाने नवीन नोकरी शोधत असल्याचे समजले. त्याच सर्वेक्षणानुसार फक्त १ / ३ लोकच आपल्या कामात खुश असतात.

 

    तुमचे काम अधिक आनंददायी करा :

 

काम करत असताना ते अधिकाधिक आनंददायी व आवडीचे करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामापैकी जो भाग तुम्हाला आवडत नाही त्याविषयी काय कराल? ते काम आनंददायी व उत्साहवर्धक करण्यासाठी तुमच्या वरिष्ठांशी सखोल चर्चा करा.

 

   तुमच्या कामाची जागा अधिक प्रसन्न बनवा :

 

तुमच्या का-यालयातील वातावरण हलके – फुलके, मजेशीर व प्रसन्न कसे बनवू शकाल? आपल्या मित्रांशी बोलून त्यांच्या का-यालयांना भेट द्या. तेथील चांगल्या गोष्टींचे अनुसरण करा.

 

  बदल स्वीकारा :

 

तुम्हाला आपल्या कामात अजिबात रस वाटत नसेल, तर ते सोडण्याचा विचार नक्की करा. तुमच्या आवडीचे काम व योग्य वातावरण असेल असे क्षेत्र निवडा. जीवन खूप छोटे असते. निराश करणा-या व न आवडण-या कामात ते व्यर्थ का घालवता.

 

७)   दिवसाची सुरवात छान करा :

 

रोजच्या दिवसाचा सुरवात वाईट होत असेल, तर यशाकडे पाठ फिरवणेच योग्य. सुरवात चांगली करणे ही यशाची गुरुकिल्ली असते.

Aristotle ने म्हणल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची चांगली सुरवात म्हणजे निम्मी लढाई जिंकलीच म्हणून समजा. कार्यालयातील काम असो, पदार्थ बनविणे असो किंवा खेळ असो. चांगली सुरवात हे निम्मे अर्धे यश संपादन करणे असते.

 

     रोज सकाळसाठी चांगल्या सवयी लावून घ्या :

 

नेहमीप्रमाणे ३० मिनिटे लवकर उठा, त्यामुळे घाई गडबडीने कामे करण्याऐवजी शांतपणे दिवसाची सुरवात करु शकता. किमान काही मिनिटे तरी चांगले, शांत, संगीत लावून चिंतन किंवा ध्यान करा. रात्रभर काही न खाल्यामुळे शरीराला ताकद मिळण्यासाठी ते आवश्यक असते. इतरांसोबत रहात असाल तर सगळे मिळून नाश्ता करा. एकमेकांशी हसतमुखाने एकमेकांची खुशाली विचारा. आदल्या दिवशी एखादी नकारात्मक चर्चा झालेली असेल तर ती परत करण्याची टाळा.

 

८)    भूतकाळाशी मैत्री करा :

 

तुम्ही स्वतःचा भूतकाळ बदलू शकत नाही ; पण त्या संदर्भातील भावना व विचार करण्याची पध्दत मात्र बदलू शकता. मागे वळून पाहताना तुम्हाला त्रासदायक व निराशाकारक ठरेल असे काही आहे का? हातच्या गेलेल्या संधी, फसलेली नाती किंवा नकळतपणे दुखावले गेलेले लोक याबद्दल वाईट वाटते का?

असे काहीही नाही, सर्व ठीक आहे,’ असे तुम्ही कदाचित म्हणाल. तुम्हाला स्वतःच्या भूतकाळाचा त्रास होत नसेलही कदाचित ; पण अजाणतेपणी अशा भावना मनाच्या कोप-यात शिल्लक असतील तर काळजी घ्या.

    

       वाळूत रूतलेले डोके वर काढा :

 

आपल्या भूतकाळातील प्रश्नांविषयी कुणाशी तरी चर्चा करण्याची तयारी ठेवा. प्रत्यक्षात एखादी समस्या असेल तर काहीच समस्या नाही, असा आभास निर्माण करु नका.

 

     वास्तव जाणून घ्या :

 

तुमच्या आठवणीत भूतकाळातील असे काही क्षण किंवा प्रसंग आहेत का ज्या विषयी तुम्हाला खात्रिशीर माहिती नाही ? खरे काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपले मित्र व कुटुंबीय यांच्याशी चर्चा करा. गरज वाटली तर संमोहन वा तत्सम उपायांची मदत घ्या.

    

     तोडगा काढा :

 

भूतकाळातील काही घटना अशा असू शकतील, ज्यावर तुम्ही तोडगा शोधू शकता जेणेकरुन तुम्हाला मनःशांती मिळेल किंवा काही गोष्टींविषयी भूतकाळात संबंधित असलेल्या व्यक्तींशी बोलणे. पूर्वी तुम्हाला काही त्रास झालेला असेल किंवा इतरांकडून दुखावले गेले असाल, अशा गोष्टींना सामोरे जायला धारिष्ट्य लागते. विशेषतः पूर्वीच्या प्रसंगातील व्यक्ती चूक झाल्याचे नाकारत असतील, तर मन खंबीर असावे असा प्रयत्न निष्ठेने करा.

 

   भूतकाळाच्या मदतीने पुढची वाटचाल करा :

 

पूर्वानुभवातील कोणत्या गोष्टींचा फायदा आज तुम्हाला होऊ शकतो? त्यातून काही शहाणपणा शिकता येतो का? कदाचित त्यांचा परिणाम तुमच्या वर्तनावर झाल्याचे दिसेल. तुम्ही आपल्या कर्तव्यापासून दूर जाताय का? त्याविषयी बोलणेसुध्दा तुम्ही टाळताय का? स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतील, अशी निवड तुमच्या आयुष्यात आहे का? याचा विचार करा.

 

९)    कामातून सुट्टी घ्या :

 

काही  लोक स्वत:च्या भरपगारी रजांचासुध्दा उपभोग घेत नाहीत, असे निरिक्षण २०१४ मधील Harris Poll यांच्या सर्वेक्षणातून मिळाले होते. त्यात असे सांगण्यात आले की, ४५% ब्रिटिश लोक सुट्टीच्या दिवशीसुध्दा कार्यालयीन कामकाज करतात, त्यामुळे आजकाल लोकांमध्ये कामाचा ताण, थकवा व व्यस्तता यांची वाढ दिसते, त्यात आश्चर्य ते काय? यूकेतील अशा ५०% लोकांपैकी तुम्ही एक आहात का? अधूनमधून कामातून सुट्ट्या घेतल्या नाहीत, तर तुमच्या कारकिर्दीवर त्याचा परिणाम होण्याचा धोका संभवतो.

 

    दिवसभरात कामाच्या मध्ये छोट्या छ्योट्या सुट्ट्या घ्या :

 

कामाच्या प्रत्येक २५ मिनिटांनंर ५ मिनिटे मोकळीक घ्या. प्रत्येक २ तासांनंतर थोडी विश्रांती घ्या. घरातील काम असो वा कार्यालयातील कामकाज, नियमितपणे घेतलेल्या छोट्या विश्रांतीमुळे तुम्ही ताजेतवाने राहता व बुध्दी तीव्र होऊन एकाग्रता वाढते.

 

सुट्टीच्या काळात सुट्टीचीच मजा घ्या :

 

तुम्हाला मिळू शकणा-या वार्षिक सुट्ट्या मोजा. त्यातून जोडून आलेल्या सुट्ट्या शोधा व सर्व सुट्ट्यांचा वापर करा. जीवन खूप छोटे आहे. कामातून विश्रांती शोधण्याची संधी सोडू नका.

 

साप्ताहिक सुट्टीतसुध्दा असे नियम लावा :

 

दर आठवड्याला दोन सुट्ट्या असतात. त्यासाठी काही नियम बनवा. उदा. त्यादरम्यान फोन किंवा E-mail फक्त एकदाच पाठवणार, त्याशिवाय सोमवारी सकाळी कामावर रुजू व्हायला तरतरी व उत्साह कसा मिळणार? याचा विचार करा.

 

१०)  जीवनाचे विद्यार्थी बना :

 

शिक्षणाच्या बाबतीत थांबला तो संपला.ज्ञान व यश हातात हात घालून येतात. आपल्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा संपल्या की शिक्षण संपले असे मानण्याची चूक करु नका.

शिक्षण म्हणजे कृती किंवा कर्तव्य नाही, तर ती एक वृत्ती असते. ऐकून घेण्याची व नवीन गोष्टी जाणून घेण्याची वृत्ती जी आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. काल जे महत्वाचे वाटले, सत्य वाटले ते आज तसे वाटेल, असे नसते म्हणून ते बदलावे लागते.

 

नव्याने काय शिकण्याची गरज आहे? :

 

आपण सर्व अशा जगात राहत आहोत जिथे ज्ञान व माहिती सतत बदलत असते. आज सुसंगत व उपयुक्त वाटणा-या गोष्टी दुस-याच दिवशी टाकाऊ होतात. नवे ज्ञान, नवीन प्रक्रीया, नवीन विचारसरणी, नवीन उत्पादने... अशा अनेक नव्या शिकण्याजोग्या गोष्टींनी आपले सभोवतालचे जग भरलेले आहे. स्वतःचे ज्ञान तुम्ही अद्ययावत ठेवत आहात का? याचा विचार करा.

 

तुम्ही आज काय शिकलात? :

 

रोज रात्री स्वतःला विचारा, मी आज काय शिकलो?’ त्याचा आयुष्यात यशस्वी व्हायला कसा उपयोग होईल? कधी कधी याचे उत्तर साधे असेल, तर कधी कल्पनाही करता येणार नाही असे असेल. असे प्रश्न रोजच स्वतःला विचारण्याची सवय ठेवली, तर अधिकाधिक समृध्द दृष्टिकोन प्राप्त होत राहिल. यासाठी स्वतःच्या उत्तरांची लेखी नोंद ठेवा.

 

औपचारिक स्तरावर काय शिकणे गरजेचे आहे? :

 

तुमच्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी कोणते औपचारिक शिक्षण वा प्रशिक्षण आवश्यक आहे? अकाउंटंसी किंवा अंतर्गत सजावट या क्षेत्रांत काम करण्यासाठी ते उपयुक्त आहेत का? अध्यापन शास्त्र किंवा पौष्टिक आहारशास्त्र यांचे प्रशिक्षण घेऊन मिळालेले प्रमाणपत्र तुमची स्वप्नपूर्ती करु शकेल का? तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल, तर स्वयंपाकाचे वर्ग घ्यायचे आहेत? की, Provence मधिल सुट्टी अधिक मजेशीर करण्यासाठी फ्रेंच भाषा शिकायची आहे? याचा विचार करा.

 

११)  अंतर्मनाचा कौल जाणा :

 

आपली अंतःप्रेरणा ही आपल्या यशाची गुरुकिल्ली असते. स्वतःच्या मनाचा कौल तुम्ही किती वेळा घेता?

तुमचा वरिष्ठ अधिकारी चांगला असेल, असे तुमचे मन सांगते. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल, मला काय वाटते?’ असा प्रश्न विचारुन, स्वतःच्या मनाचा कौल घेण्याचा तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करता का? स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवल्याने कामात वा इतरत्रही उपयोग होतो. जेव्हा बाह्यदबावामुळे तुमचा आतील आवाज दडपून टाकला जातो तेव्हा समस्या उद्भवते.

 

शंकांचे निरसन करा :

 

स्वतःचे मन काय सांगते, हे ऐकण्याची कल्पना तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल.

·       स्वतःच्या अंतःप्रेरणेच्या बळावर काम करताना या गोष्टींचा विचार करा.

·       स्वतःच्या मनाचा कौल घेउन निर्णय घेतला व तो योग्य ठरला.

·       मनाचा कौल दुर्लक्षित करुन दुसरा पर्याय निवडला ; पण नंतर लक्षात आले की, मनाचा कौल बरोबर होता.

 

तर्कशुध्द विचार करणे, वास्तवतेला धरुन चालणे किंवा बारकाइने विचार करणे या गोष्टी सोडुन देण्याचे          कारण नाही. वास्तवतेच्या आधारे सूक्ष्म विचार करुन अंतःप्रेरणेचाही विचार करा व दोन्हींचा ताळमेळ साधा.

 

शांत राहून मनाचा कौल जाणा :

 

स्वतःच्या मनाचा नेमका कौल जाणण्यासाठी शांतपणे विचार करा. एखाद्या निवांत जागी आरामात बसून शांतपणे विचार करा. चारही बाजूंनी आपल्या मनावर, बुद्धवर मारा होणा-या बाह्यविचारांना टाळणे हा उद्देश आहे.

ध्यानधारणा शिकणे हा एक चांगला मार्ग आहे. ध्यानधारणा शिकवणारे गुरु या कामी मार्गदर्शन करतील.

 

१२) ताणतणाव घालवा :

 

मानसिक ताणामुळे जीवनात धोका संभवतो. ताणाच्या अतिरेकामुळे तुमची स्वप्ने उद्ध्वस्त होतातच ; पण आनंदही हिरावतो, त्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. घरातही ताणतणाव निर्माण होऊन कामासंदर्भातील योजनाही धुळीस मिळतात. तुम्ही जीवनात सुखी नसाल, मन अशांत असेल तर ताणतणाव निर्माण होतात.

 

परिणाम अधिक गंभीर होण्यापूर्वी काळजी घ्या :

 

जीवनातील स्वास्थ्य व आरोग्य यांवर ताणांचा गंभीर परिणाम होतो. याची लक्षणे साधारणपणे वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत पुढीलप्रमाणे ठळकपणे दिसून येतात.

·       स्नायूंचे ताठरणे, पाठदुखी, थकवा किंवा गरगरणे यांसारखी शारीरिक लक्षणे तुम्हाला जाणवतात का?

·       भावनिकदृष्ट्यासुध्दा मनावर ताण जाणवतो. तुमच्या निकटवर्तीयांवर रागवणे, चिडचिड करणे किंवा दखल न घेणे असे होते का?

·       मानसिकदृष्ट्याही ताण जाणवेल. उत्साह नसणे, थकवा येणे किंवा कशावरही लक्ष केंद्रित करता न येणे. विचारशक्ती क्षीण होणे ही धोकादायक लक्षणे आहेत.

·       कामाच्या ताणामुळे आध्यात्मिक टप्प्यातही ताण जाणवेल. कशाला महत्व आहे, आयुष्यात नेमके काय करावे, असे प्रश्न पडतील.

ताणतणावांचा तुमच्यावर काय परिणाम झाला आहे ते लक्षात आले की, तो कमी करणेही सोपे जाईल. इच्छा असेल तर मार्ग सापडतोच.

 

कारणे समूळ नष्ट करा :

 

जीवन ताणरहित ठेवण्याचा प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर असते. यासाठी काही कठोर उपाययोजना अमलात आणाव्या लागतील. उदा. काही लोकांबाबत किंवा विशिष्ट प्रसंगी कमीत कमी वेळ व ताकत वापरणे.

एखाद्या ताणल्या गेलेल्या नात्यातून मूक्त होणे किंवा कामाचा ताण असह्य होत असेल तर राजीनामा देणे, असे उपायही करता येतील. या पुस्तकात दिलेले सर्व सल्ले तुमचे जीवन ताणरहित करण्यासाठी, त्यात आवश्यक ते बदल घडण्यासाठी उपयुक्त ठरतील.

 

१३)   सर्वांचे आवडते व्हा :

 

भरपूर मित्र असणे हे यशस्वी जीवनाचे लक्षण आहे. त्यामुळे लोकांना तुमच्या अवतीभवती असायला आवडत असेल तर चांगलेच आहे. जर तसे नसेल तर, चांगले श्रोते असणे, विश्वासू असणे, चांगुलपणा, उदारता, शांतपणा असे गुण असणे, सकारात्मक असणे, निःस्वार्थ असणे असे आवश्यक स्वभावगुण बाळगणे गरजेचे आहे.

लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करा ; पण स्वतःशी प्रामाणिक राहा. कधी कधी लोकप्रियतेसाठी विशिष्ट प्रकारे बोलणे वा वागणे यांसारखी किंमतही मोजावी लागेल. या गोष्टींचे पुरेसे भांडवल जमले की, मग काही प्रश्न नाही. कधी कधी काही कठोर निर्णयही घ्यावे लागतात ; पण जर तुमच्या लोकप्रियतेच्या जमा – खात्यात पुरेसे भांडवल असेल, तर लोकांचा विरोध निर्णायक असेल.

 

कोणते गुण अंगी बाणवले जावेत ? :

 

सर्वांचे आवडते होण्यासाठी तुम्हाला काय करायला हवे आहे ? तुमच्या सवयी वा स्वभाव त्याच्या आड येत आहे ?

 

·       वयोमानानुसार तुम्ही अधिक आग्रही झाला आहात का ?

·       घरातील वा कार्यालयातील लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे तुम्ही टाळता का ?

·       स्वतःचेच मत ग्राह्य धरले जावे, असा तुमचा आग्रह असतो का ?

·       सर्वांशी सख्य वाढावे, अधिकाधिक व्यक्तींच्या संपर्कात राहावे यासाठी मी काय करावे, असा सहज जवळच्या मित्राला वा कुटुंबीयांना प्रश्न विचारा. कदाचित, वाईट वाटेल वा आश्चर्य वाटेल अशा प्रतिक्रिया ऐकण्याची मनाची तयारी ठेवा.

 

 सर्वांचे प्रिय होण्यासाठी त्यागवृत्ती जोपासावी :

 

आयुष्यात काही क्षण असेही येतात, जेव्हा आवडते राहण्यासाठी काही करणे किंवा मनापासून खरेच ते करावेसे वाटते यात तडजोड करावी लागते. कल्पना करा की, भावी जोडीदार शाकाहारी आहे व मांसाहारी लोकांबरोबर राहणे त्याला आवडत नाही. अशा वेळी आपल्या जोडीडाराला प्रेम व आधार देण्यासाठी स्वतःच्या कल्पना व भावना बाजूला ठेवून, समजूतदारपणा दाखवू शकाल का ? याचा विचार करा.

 

निष्कर्श....

 

आज आपण निगेल कंबरलँड यांच्या  १०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू या पुस्तकाचा संक्षीप्त सारांश बघितला हे पुस्तक प्रत्येकासाठीच एक मार्गदर्शक ठरेल असेच हे पुस्तक आहे. या पुस्तकात कंबरलँड यांनी एकदम सोप्या भाषेत १०० कृती सांगितल्या आहेत जे तुमचे जीवन घडवण्यात मदत करेल.

तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी, चातुर्याने, आनंदाने योग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व तत्वे यांचा समावेश यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे या पुस्तकात आहे. तेव्हा हे पुस्तक सर्वांनी एकदा तरी वाचावच असच आहे.

 

           

 


No comments:

Post a Comment

आपल्या निरोगी आरोग्यासाठी टॉप ५ टिप्स :

  आपल्या निरोगी आरोग्यासाठी टॉप ५ टिप्स :   आपले आरोग्य हे आपल्यासाठी सर्वकाही असत आरोग्य चांगले असेल तर आपण प्रत्येक गोष्ट अगदी उत्साहाने...